Saturday, December 12, 2020

पहाट

पहाटेची ती प्रसन्न वेळ काय करावे त्याचे वर्णन
सर्वत्र दरवळणारा तो रम्य सुगंध
पानापानांत उठून दिसणारा तो टवटवीत पणा 

आईच्या मांडीवरून उतरताच धावत सुटणाऱ्या नुकतेच चालणे शिकलेल्या बाळा सारखे 
प्रत्येक झाडा - फुलाला शिवू पाहणारे आणि आपल्या पिवळ्या मोहक रंगाने संपूर्ण सृष्टीला रंगवून टाकणारे
पहाटेच्या मांडीवरून उतरून सर्वत्र धाव घेणारे ते सूर्यकिरण 

निसर्गात सगळीकडे नजरेस पडणारे ते चैतन्य
वातावरणात भरून राहिलेला एक अद्भुत चमत्कारी अनुभव
प्रत्येक श्वासातून आत उतरणारा आणि अंगावर रोमांच उभे करणारा तो उत्साहीपणा

प्रियकराच्या कुशीत शिरलेल्या प्रेयसी सारखे लाजून लालबुंद झालेले
हात लावताच थरथरणारे, अजूनच जास्त लपू पाहणारे
नाजूक वेलींवर डोलत बसणारे ते कोवळे फुल 

डोळ्यांना आल्हाददायक वाटणारे ते हिरवेगार कोवळे लुसलुशीत गवत
पायांना पूर्ण भिजवून टाकणारे गवतावर पडलेले  ते दवबिंदू 
आणि त्या गवतावरून चालतांना होणारा पावलांना गुदगुल्या करणारा तो स्पर्श 
पायांपासून सुरु होऊन अगदी डोळ्यांपर्यंत पोहोचणारा त्यातील तो गारवा

मोठ्या झाडाच्या सावलीत विसावणारे इटुकले पिटुकले  रोपटे
अन त्यावर उमलणारे नाव माहित नसलेले एखादे विलोभनीय फुल
त्याचा मनात भरून राहणारा विलक्षण सुगंध 

किती दिवसांचे आपले आयुष्य आहे हे माहित नसलेले परंतु तरीही आपल्या आगळ्या वेगळ्या  सौंदर्याने 
आणि अनोख्या सुगंधाने सर्वांना प्रसन्न करणारे गवतावरील ते क्षणभंगुर जीवन असलेले फुल

अन् या सर्व अदभुत आणि नयनरम्य निसर्गसौदर्याने नटलेली, सजलेली पटकन सरून जाणारी
 तरी मनाला एक सुखद अनुभव देणारी ती हसरी, मोहक पहाट...