काळासोबत चालले नाही तरी चालू शकते पण नेहमी सत्यासोबत राहायला हवे कारण सत्य तुम्हाजवळ असेल तर काळ आपोआपच तुमच्या सोबत येईल. समजावण्यापेक्षा समजून घेण्यासाठीच मोठी परीक्षा असते कारण समजावण्यासाठी अनुभव आणि ज्ञान लागते पण समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो जो सर्वांकडे नसतो. नेहमी आपल्या मनातील चांगल्या विचारांना प्रोत्साहन आणि उत्तेजन द्या कारण आपण आपल्या विचारांपेक्षा जास्त मोठे कधीही होऊ शकत नाही. जे वात बघतात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतात, जास्त चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्कृष्ट गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. एकदा प्रयत्न केल्यावर अपयश आल्यास थांबू नका कारण प्रयत्नांती परमेश्वर हे कोणी उगाचच म्हटलेले नाही. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खूपच लहान आहेत असे समजा. आयुष्य अवघड आहे हे खरे पण ते अशक्य मुळीच नाही हे देखील तितकेच सत्य आहे. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर नेहमी जगाचा विचार करणे सोडून द्या.
Thursday, October 7, 2021
आयुष्य जगण्याचा मूलमंत्र
फुलांचा सुगंध हा ज्या दिशेला वारा असेल त्या दिशेला पसरतो मात्र व्यक्तीच्या स्वभावातला चांगुलपणा सर्व दिशेला पसरतो. माणूस मनात म्हणतो की माझ्याजवळ पैसा आला की मग मी काहीतरी चांगले करीन पण पैसा माणसाला म्हणतो तू काहीतरी चांगले कर मगच मी येईन.
Tuesday, September 21, 2021
खरा महान कोण??
मी किती मोठा आहे हे दाखवण्यासाठी एकदा एका विशाल समुद्राने लहानशा झऱ्याला चिडवून म्हटले, तू कधी पर्यंत लहानसा झराच बनून राहणार आहेस मोठा समुद्र कधी होशील तू?? समुद्राचे असे हिणवणारे शब्द ऐकल्या नंतर झऱ्याने नम्रपणे समुद्राला उत्तर दिले, महान आणि मोठे होऊन खारट बनण्यापेक्षा मी लहान असून गोड बनून राहीन हेच माझ्यासाठी उत्तम आहे कारण तू इतका मोठा असून तुझ्याजवळ भरपूर पाणी आहे तरी तुझे पाणी पिण्यायोग्य नाही पण येथे माझ्या जवळ तर जंगलाचा राजा सिंह देखील येऊन पाणी पिण्यासाठी माझ्यासमोर वाकतो. झऱ्याचे हे उत्तर ऐकून समुद्र खजील झाला आणि गप्प बसला.
असेच माणसाचे देखील आहे, स्वतःला मोठे आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ समजून इतरांना तुच्छ मानण्याने कोणी महान बनू शकत नाही. अशा प्रकारे स्वतःला महान समजून दुसऱ्यांची परवा न करता स्वतःच्या गुर्मीत जीवन जगण्यापेक्षा लहान बनून लोकांच्या जीवनात आनंद देऊन त्यांच्या उपयोगी पडणे केव्हाही चांगले. कारण महानता तुमच्या मोठ्या आकाराने किंवा हुद्द्याने मिळत नाही तर तुमच्या वागण्यातील मोठेपणाने मिळते.
Friday, July 9, 2021
सफल आयुष्याचा मूलमंत्र
आयुष्यात दोन गोष्टी कधीही करू नका चुकीच्या व्यक्तीवर प्रेम आणि खऱ्या व्यक्ती सोबत गेम.
संकट नेहमी अप्रतिम लोकांच्या वाट्याला येतात, कारण ती लोकं त्या संकटांना अप्रतिम रीतीने तोंड देऊ शकतात
जे लोक संयम ठेवून वाट पाहू शकतात त्यांच्याजवळ प्रत्येक गोष्ट काही ना काही करुन पोहोचतेच
स्वप्न त्यांना म्हणत नाही की आपण झोपल्यावर पाहतो, स्वप्न तर त्यांना म्हणतात जे तुम्हाला झोपू देत नाही
हृदयाचे धडधडणे फक्त एवढा दाखवते की माणूस जिवंत आहे की नाही पण डोळ्यातली चमक हे दाखवते की माणूस जीवन जगत आहे की नाही
काटे टोचल्यावर आपण काट्यांना दोष कसा देऊ शकतो, पाय तर आम्ही त्यांच्यावर ठेवला होता ते तर त्यांच्या जागी स्थिर होते
जगात सर्वात चांगला विचार तुम्हाला करायचं असेल तर सर्वप्रथम दुसऱ्यांविषयी वाईट विचार करणे बंद करा
डोक्यात विचारांचा ट्रॅफिक जितका कमी असेल तितकाच जीवनाचा प्रवास सोपा होऊन जाईल
गोड भाषण चांगल्या सवयी, उत्तम व्यवहार आणि चांगले लोक नेहमीच सन्मान पावतात
Sunday, June 27, 2021
शब्द प्रेरणा
शब्द फुकट भेटतात पण तुम्ही ते कसे वापरता यावरून शब्दांची आणि तुमची किंमत ठरत असते.
वेळ वाईट असेल तर मेहनत करा, वेळ चांगली असेल तर कोणाची मदत करा.
प्रत्येक व्यक्ती आपल्या जिभे मागे लपलेला असतो जर तुम्हाला त्या व्यक्तीला समजायचे असेल तर त्यांना बोलू द्या.
घट्ट पकडल्याने देखील कधीकधी नाजूक बोटे हातातुन सटकतात म्हणूनच कोणतेही नाते जोर लावून नव्हे तर प्रेम लावून धरले जाते.
जरी लोकांना वाटते की तुम्ही चांगले करावे परंतु हे देखील सत्य आहे की त्यांना असं कधी वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले करावे.
भाग्य देखील त्यांना साथ देतो जे कठीण परिस्थितीत देखील आपल्या लक्ष्यासोबत टिकून राहतात.
चूक कडुलिंबाची नाही की तो कडू आहे दोष तर जीभेचा आहे जिला गोड चव आवडते.
सर्वांना ह्याचे दुःख आहे की आयुष्यात खूप कमी भेटले आहे, परंतु जरा विचार करा, जितके तुम्हाला मिळाले आहे तितके देखील कित्येकांना मिळाले नाही.
खोटे ह्यासाठी नेहमी विकले जाते कारण खरे विकत घेण्याची लायकी सर्वांजवळ नसते.
जर तुम्ही पूर्णपणे तुटून गेल्यावरही हसू शकता तर हे नक्की आहे की जगात कधी कोणीही तुम्हाला तोडू शकत नाही.
विश्वास ठेवा, जेव्हा आपण कोणाचे चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी देखील कुठे तरी काही तरी चांगले होत असते.
खरेपणा आणि चांगले पणा यांचा शोध करण्यासाठी संपूर्ण जगात फिरून पाहा... जर तो तुमच्यातच नसेल तर तो कुठेच नाही.
कोणी सन्मान करो वा न करो, चांगले कर्म करीत रहा, कारण सूर्योदय तेव्हाही होतो जेव्हा करोडो लोक गाढ झोपेत असतात.
निंदेला घाबरून आपल्या लक्ष्यापासून भटकून जाऊ नका कारण लक्ष्य साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मते बदलून जातात.
कधी कोणाला जाणून बुजून दुखवू नका, कारण दिली गेलेली वस्तू हजार पटीने आपल्याजवळ परत येत असते.
Saturday, May 29, 2021
रागाचे मूळ
राग का येतो ? तर मनासारखे न झाल्यामुळे. खूप वेळा एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या घटनेविषयी आपल्या मनात आपण एक मनोधारणा तयार केलेली असते. आणि ज्यावेळी आपण मनात विचार केल्याप्रमाणे समोरील व्यक्ती वागत नाही किंवा प्रसंग घडत नाही त्यावेळेस आपल्याला राग येतो. राग येणे ही स्वाभाविक आणि साहजिक गोष्ट आहे. परंतु आपल्या रागामुळे होते काय तर ज्या व्यक्तीवर आपला राग आहे त्या व्यक्तीपेक्षा आपल्याला त्याचा जास्त त्रास सहन करावा लागतो. एक घटना अलिकडलीच माझ्या एका मित्राला मुंबईत मीटिंग अटेंड करायची होती आणि मुंबई मधील वाहनांची गर्दी तर आपल्या सर्वांना ठाऊक आहे. गाडी चालवत असताना त्याने सिग्नल दिला व गाडी बाजूला नेऊ लागला त्यावेळेसच मागून एक दुसरा गाडीवाला भरधाव वेगात येत असताना वेळेवर ब्रेक न लावल्यामुळे त्याची गाडी माझ्या मित्राच्या गाडीला घासली गेली व मित्राच्या गाडीवर ओरखडे उठले. गाडी म्हणजे मित्राचा जीव की प्राण.. गाडीची ही अवस्था बघताच मित्राचा पारा गगनाला भिडला व तो मारमारीच्याच उद्देशाने गाडीतून खाली उतरला. इतक्यात समोरील गाडीतील व्यक्ती सुद्धा गाडीतून उतरली मित्र त्याच्या शर्ट ची कॉलर धरणार इतक्यात तो व्यक्ती अगदी शांतपणे मृदू आवाजात म्हणाला, आय अँम रियली वेरी सॉरी माझ्या घाई मुळे आपल्या गाडीला नुकसान झाले. मी मनापासून माफी मागतो आपल्या गाडीच्या दुरुस्तीसाठी लागणारा सर्व खर्च मी देतो. त्याचे हे शब्द ऐकताच माझ्या मित्राचा राग एकदम शांत झाला. गाडीवर फक्त एक ओरखडा उठला असल्यामुळे त्याच्या कडून कोणत्याही प्रकारची भरपाई मागणे चुकीचे होते. तसेच समोरच्या व्यक्तीने मागितलेल्या माफिमुळे त्या प्रसंगी मोठे भांडण होण्यापासून टळले. तदनंतर माझा मित्र तेथून निघून थेट त्याच्या मीटिंग च्या जागी पोहोचला आधीच उशीर झालेला असताना मध्येच गाडीच्या ह्या लहानशा घटनेमुळे मित्र मीटिंग साठी अर्धा तास उशिरा पोहोचला होता ज्या व्यक्तीसोबत मीटिंग करायची होती त्याच्या तोंडावर त्याची नाराजी स्पष्ट दिसत होती पण तेथे पोहोचताच मित्राने प्रेमळ आवाजात उशिरा येण्या बद्दल दिलगिरी व्यक्त करीत येण्यासाठी झालेल्या उशिराला मागच्या कारणाला स्पष्ट करून सांगितले व समोरच्या व्यक्तीचा वेळ वाया घालवल्या बद्दल क्षमा मागितली मित्राचे शब्द संपताच समोरच्या व्यक्तीने आपला राग विसरत उलट मित्राच्या हालहवालाची चौकशी केली. ह्या उदाहरणाने एक गोष्ट स्पष्ट झाली की अशाच प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये आलेल्या कोणत्याही रागाच्या प्रसंगी शांत डोक्याने मृदू जीभेचा वापर केला तर नक्कीच समोरच्या व्यक्तीचा व आपलाही राग कमी होण्यास नक्कीच मदत होते.तर मग चला आज पासून कोणत्याही रागाच्या प्रसंगी शांत डोक्याने व प्रेमळ शब्दांनी समोरच्या व्यक्तीचा राग शांत करूया. म्हटले आहे ना, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
Friday, April 16, 2021
निःशब्दता
तुझी ती भयाण निःशब्दता...
बालपणी मोठे होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तुला बालपणाच्या मोहक आठवणींची साद येत आहे का
लहानपणी दगडावर ठेच लागताच डोळ्यांतून घळघळ पडणाऱ्या अश्रुधारांचा ओलावा तुला जाणवत आहे का
मित्रांसोबत केलेल्या धमाल मस्तीची आणि खोडकरपणाची धुंदी तुला आठवत आहे का
किशोरवयात झालेल्या पहिल्या प्रेमाची अन् चोरून चोरून एकमेकांना पहण्यातली एकमेकांना भेटण्यासाठी केलेल्या धडपडची गंमत तुझ्या मनाला आल्हाददायक वाटते का
तरुणपणी खांद्यावर पडलेल्या जबाबदारीची अन् कुटुंबाला सांभाळताना सर्वांच्या गरजा पूर्ण करण्याच्या तुझ्या घालमेलीची झळ तुला लागत आहे का
समाजासाठी व कुटुंबासाठी कितीतरी दुःख असून सुद्धा चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या तुला त्या तुझ्या हास्यातला निरर्थकपणा आठवत आहे का
स्वतःचे मन मारून इतरांना खुश ठेवण्यासाठी नेहमी झटणाऱ्या तुला आज सर्वांच्या डोळ्यांतले तुझ्यासाठीचे अश्रू दिसत आहेत का
आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला तुझ्या तन मन सर्वांगाला होत असलेल्या वेदनांना तू अजूनही अनुभवत आहेस का
शरीरातून प्राण निघून गेल्यावर तू जिवंत असताना तुला कधीही चांगले न बोलणाऱ्या लोकांना रडतांना पाहून तुला राग येत आहे का
तुझ्या थंड शरिराजवळ बसून तुझ्यावर खऱ्या मनाने प्रेम करणाऱ्या लोकांची साद तुला ऐकू येत आहे का
तुझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाला झेलणाऱ्या तुझ्या मित्रांना तुझी ही निःशब्दता नको आहे
त्यांच्यावरचे तुझे प्रेम दाखवण्यासाठी एकदा तरी तू परत उठशील का
आयुष्याचे दिवस इतरांसाठी घालवणाऱ्या आपल्या लोकांशी न बोलता राहू न शकणाऱ्या तुझी ही निःशब्दता सर्वांना टोचत आहे
परत...परत एकदा तुला तुझ्या प्रेमळ डोळ्यांनी आपल्या माणसांना पाहता येईल का
फक्त आणि फक्त तुझ्या लोकांसाठी तूला ही निःशब्दता तोडता येईल का...??
Tuesday, April 13, 2021
प्रेमश्रावण
मनात ठसलेला तो चेहरा अन् तो मोहक आवाज
वेड लावणारी ते बोलणे आणि हसणे
माझ्या आयुष्यात तुझ्या येण्याने जीवनात आलेला तो श्रावण
सर्वांच्या लाडक्या, ऊन सावल्यांचा खेळ खेळणाऱ्या श्रावणासारखेच
माझ्या मनातील लाडक्या पहिल्या प्रेमाच्या श्रावणाने मन जिंकून घेतले
पहाटेला साद घालणारे पक्षी पहाट होताच आनंदाने किलबिल करू लागतात
तसेच प्रेमासाठी आसुसलेले मन प्रेम होताच
आनंदाने गुणगुणू लागले
श्रावणसरींनी भिजून टवटवीत दिसणाऱ्या धरेप्रमाणे सुखाच्या सरींनी भिजत जाणारे खुललेले माझे मन प्रेम गीत गाऊ लागले
बहरून आलेल्या बागेप्रमाणे प्रफुल्लित झालेले माझे अंतरंग
पूर्ण रंगात आलेल्या श्रावणाच्या कर्तुत्वाने तृप्त झालेल्या धरणीसारखे प्रेम रंगात रंगून गेले
श्रावणाच्या आल्हाददायक अन् आनंदी परिसरासारखे
माझेही अंग अंग प्रेमाच्या श्रवणाने आनंदित होऊ लागले
त्या पहिल्या प्रेमाचे आणखी काय वर्णन करावे श्रावणा सारखाच तो सांगता येत नाही फक्त अनुभवावा लागतो...
Sunday, February 7, 2021
प्रेम
प्रेम तिलाही आहे अन् प्रेम त्यालाही आहे
तरी माझ्या मनातले भाव त्याला समजत नाही अशी तिची समजूत आहे
मी न बोलता केलेले प्रेम हिला उमगत नाही अशी त्याची तक्रार आहे
प्रेमात वाद नसून सुसंवाद असायला हवा
'ती' ची मनधरणी करण्यासाठी 'त्या' ने कसून प्रयत्न करायला हवा
'त्या' ला काय हवे आहे हे समजण्यासाठी 'ती' ने धडपड करायला हवी
क्षणात रुसणे हा तिचा स्वभाव असला तरी
तिला खुदकन हसविण्याचा फंडा त्याला माहीत असतो
अन् तो कितीही नाराज किंवा रागात असला तरी आपल्या प्रेमाने त्याचा अबोला दूर करण्याची जादू ती च्या अंगी असते
प्रेम तर सर्व करतात परंतु प्रेमात जीव ओतायला सर्वांनाच जमते असे नाही
रडता रडता डोळ्यातले अश्रू पुसून समोरच्या साठी हसणे सर्वांनाच जमते असे नाही
सुखात सर्व सोबती असतात परंतु दुःखाच्या काळात हात न सोडता सोबत देणे ते खरे प्रेम
तू मला आवडतेस म्हणणे सोपे पण
तुझ्या सर्व चांगल्या वाईट गुणांसोबत मी तुझ्यावर प्रेम केले आहे हे कृतीतून दाखवून देणे अवघड
तुझी साथ कधी सोडणार नाही म्हणणे सोपे पण
वाईट परिस्थितीला न घाबरता त्याच्या बरोबर हिमतीने उभे राहून त्याला सोबत देणे अवघड
प्रेम हे स्वीकारले तर जीवन आहे आणि नाकारले तर स्वप्न आहे
प्रेमात स्वतः पडल्याशिवाय त्यातील गमतीजमती कळत नाहीत.
म्हणूनच आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी मनापासून प्रेम करायलाच हवे.
Tuesday, January 12, 2021
गुप्त खजिना
खजिना म्हटलं की डोळ्यांपुढे उभा राहतो तो एक जुनाट महाल अन् त्याच्यातून जाणारा एक भुयारी मार्ग जो खालच्या तळघरातील गुप्त खजिन्याजवळ नेतो. डोळे आणि मन भरून जाईल असा संपत्तीचा महाकाय ढिगारा. परंतु जो किमतीने मोजला जातो तो जर खजिना म्हटला जात असेल तर मौल्यवान खजिना प्रत्येकाच्याच जवळ लपवलेला सापडेल, मी ज्या गुप्त खजिन्या विषयी बोलत आहे तो म्हणजे आपल्या जुन्या आठवणींचा खजिना, अनुभवांचा खजिना. हा असा खजिना आहे ज्याने प्रत्येक जण समृध्द झालेला असतो. मग ती व्यक्ती तरुण असो वा वयस्कर.
कटू गोड आठवणींचा खजिना, कधी डोळ्यांत टचकन पाणी आणणारा तर कधी ओठांवर हसू उमलवणारा, कधी अंगावर शहारे उठवणारा तर कधी खदखदून हसायला लावणारा. फार काही रोमांचक असे प्रत्येकाच्या जीवनात घडतेच असे नाही. परंतु जे काही घडते तो अनुभव प्रत्येकासाठी दुर्मिळ आणि नवीन असा असतो. प्रत्येकाच्या आठवणी मनात एक विशिष्ट जागा धरून असतात. या आठवणींची पेटी क्वचितच उघडली जाते. कधी एकांतात त्या आपोआप डोळ्यांपुढे फिरू लागतात तर कधी कोणता विषय निघाल्यास कोणोासमोर तरी उघडल्या जातात. लहानपणी चोरून खाल्लेली बोरे, आंबे, चिंचा तर कधी भर उन्हात खेळत असताना जोरात ठेच लागून झालेली जखम, कोणा मित्र किंवा मैत्रिणीसाठी स्वतः खाल्लेला मार किंवा खूप मार खाल्ल्यावर मेहनताना म्हणून संध्याकाळी पालकांसोबत बाहेर जाऊन खाल्लेली आईस्क्रीम. या छोट्या छोट्या आठवणी खराब असलेल्या मूड ला पटकन बदलून टाकतात. कधी गपचूप जाऊन केलेली पार्टी तर कधी सवंगड्यांच्या लग्नात केलेली धमाल. कधी मैत्रिणीच्या आईला तिच्याविषयी केलेली चुगली आणि मग आपल्यासमोर तिला आईकडून ओरडा भेटतांना घेत असलेली तिची बाजू. कधी शेजाऱ्यांच्या घरातल्या समस्यांसाठी धावत जाऊन केलेली मदत तर कधी दुसऱ्याकडून आपल्या दुःखात पाठीवर भेटलेली सहानभुतीची थाप. मानवी मन अशा अनेक विलक्षण आठवणींचा समुद्र आहे आणि या आठवणी त्या समुद्रातील गुप्त खजिना.
Subscribe to:
Posts (Atom)