कधी गम्मत म्हणून कोणते चित्र काढायला घेतले की चित्रकारीतेच्या व्यवसायाला काही किंमत नसते असे म्हटले जाई
कधी लेखणी धरली बोटांत तर लेखिका व्हायचे आहे का विचारून कुत्सित हसले जाई
त्या लहानग्या जीवाला लहानपणीच कोंडले जाण्याचा प्रयत्न केला जाई
आई वडिलांचा मात्र हट्ट तुला जे आवडेल तेच कर आणि तेच बन
पण जशा सगळ्यांच्या अपेक्षा आहेत माझ्याकडून तसे ह्यांनाही काही वाटत असेल ना आपल्याविषयी
आपण त्यांच्या अपेक्षांना पूर्ण करू शकू ना
ह्या विचारांनी जीव बेजार व्हायचा
बाहेर जावे तर गुणी बाळ बनून राहावे ही लोकांची अपेक्षा
जोरात ओरडून बोलावे तर किती हा गोंगाट आहे म्हटले जाई
अन् न बोलावे तर मुग गिळून गप्प बसली आहे म्हणून हिणवले जाई
कुठे जास्त हसले तर तुमची मुलगी फारच आगावू आहे
तर कुठे शांत राहिल्यास तुमची मुलगी अजिबात ऍक्टीव्ह नाही असे शब्द ऐकावे लागत
कोणाची मी शांत रहावी ही अपेक्षा तर कोणाची मी चंचल असावी ही अपेक्षा
शाळेत हुशारच असावे ही पालकांची आणि शिक्षकांची अपेक्षा
तर इतर गोष्टीही यायला हव्यात नुसता अभ्यासुपणा काय कामाचा ही लोकांची अपेक्षा
मुलगी ही गोरीच दिसायला हवी काळी नसावी ही लोकांची अपेक्षा
तर गोऱ्या तोंडाला काय सोने लागलेले आहे तू आहेस त्यापेक्षा अधिक चांगली वाग ही घरच्यांची अपेक्षा
शिकून सवरून चांगल्या कामाला लाग आणि नवऱ्या सोबत घरखर्चाला हातभार लाव ही कुटुंबीयांची अपेक्षा
तर मुलीने शिकून काय होणार आहे कितीही शिक्षण होऊ देत मुलीला काही मूल आणि चूल थोडी ना सुटणार आहे अशी लोकांची अपेक्षा
असे हे जीवन एक अपेक्षांचे ओझे आहे
आपल्या स्वतःच्या हक्काच्या आयुष्यात आपण दुसऱ्यांच्या अपेक्षांचे ओझे वाहत असतो
कोणाला काय वाटेल कोण काय म्हणेल हा विचार करून आपले बोलणे, चालणे, वागणे ठरवत असतो
पण या धावत्या आयुष्यात कोणी थोडे थांबून मला काय करावेसे वाटते हे विचारले आहे का
पण मी स्वतः तरी कधी थांबून हा विचार केला आहे का की मला स्वतः कडून काय अपेक्षा आहेत
एकदा हे अपेक्षांचे ओझे पाठीवरून उतरवून कधी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून स्वतःच्या स्वतःकडून अपेक्षा काय आहेत याचा विचार करताच लोकांच्या अपेक्षांचे हे ओझे किती शुल्लक आहे ह्याची जाणीव होते
आपल्यातल्या कमी घटी आपले गुण अवगुण आपली ताकद ही आपल्यालाच ठावूक असते त्यामुळे आपण स्वतःकडून काय अपेक्षा करतो हे जाणून घेतल्यावर हे अपेक्षांचे नकोसे ओझे सहज उतरवता येते.
अपेक्षा करावी म्हटली की संपूर्ण आयुष्यही पुरत नाही आणि न करावी म्हटली की तिच्या अस्तित्वाची जाणीव देखील होत नाही...