Tuesday, July 4, 2023

मैत्रीचे पान


      

 मैत्रीचे ते पान जे जीवन रुपी पुस्तकात जपून ठेवले जाते..जितके जुने झाले तितकेच अजून जाळीदार बनते. जितके जुने होते तितके अधिक सुंदर भासू लागते. या पानावर अनेक आठवणींचे जाळे पसरलेले असते. जाळीच्या प्रत्येक नक्षीत एका वेगळ्या भावनेची गुंफण असते. कोणत्या जाळीत डोकावल्याने ओठावर हसू उमलते तर कोणती जाळी डोळ्यात पाणी आणते. एका टोकावर गमतीची नक्षी असते तर दुसऱ्या कोपऱ्यात विरहाचे दुःख सलते. कधी कधी टोकावर विरणारे हे पान हृदयाला चरे घालून जाते तर कधी कधी हेच पान सुंदर ढगात बसवून आकाशाची सफर घडवून आणते. प्रत्येकाच्या पानाची जाळी आणि प्रत्येकाच्या मैत्रीचे बंध हे जरी वेगवेगळे असले तरी प्रत्येकाच्या हृदयात ह्या मैत्रिरूपी पानाची जागा भक्कम असते. काही पानांना फार दिवसांपासून स्पर्श न केल्यामुळे ते नाजूक बनते तर काही पानं वारंवार हात लावल्याने विरू लागतात. मैत्रीचे बंध जरी नाजूक भासत असले तरी ते आयुष्यभर टिकणारे असे असते. कितीही जुने झाले तरी त्यातील ऋणानुबंधांचा गंध काही कमी होत नसतो. त्या जुन्या आठवणींचा तो कोमल मखमली स्पर्श मनाला सुखावून जातो. कधी एकटे वाटल्यास हळूच पुस्तक उघडून ते मैत्रीचे पान बाहेर काढावेसे वाटतेत्यावरील मखमली आठवणींच्या जाळीला निरखून पहावेसे वाटते. एकट्या मनाला आधार देणारे ते पानदुःखी हृदयाला दुःख विसरावयास लावणारे ते पानअबोल मनाला शब्दांचा स्पर्श करणारे ते पानअखेर वाळवंट झालेल्या अंतकरणाला मृगजळ बनते ते पान. शेवटी व्यक्ती दूर झाल्या तरी आठवणी मात्र कायम राहतात. सहवास जरी कमी झाला तरी आभास मात्र कायम राहतो. आणि पुस्तक जरी बंद झाले तरी ते पान त्या पुस्तकात लपून जाते आणि त्या पुस्तकाचाच  एक भाग बनते. मैत्री ही अशीच असते जीवनात येते आणि जीवनाचाच एक अविभाज्य भाग बनून जाते. तुमच्याही आयुष्यात असेलच ना असे एखादे पान..!!!!

 

                            

 


Wednesday, November 2, 2022

यश प्राप्ती

यश प्राप्तीसाठी कठीण मार्ग निवडावा लागतो. पण एकदा का आपण तो मार्ग निवडला तर काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडायचा नाही. जरी मार्ग कितीही खडतर असला आणि मार्गात संकटे आली, अनेक अडचणी आल्या, तुम्हाला विरोध झाला, तुमचा अपमान झाला, कोणी तुम्हाला नावे ठेवली, तुमचे पाय मागे ओढण्याचा प्रयत्न केला, तुमच्या विचारांची थट्टा उडवली, तुमच्या प्रयत्नांची मस्करी केली, मार्गात अडवले, काहीही झाले तरी मार्गात थांबू नका. चांगल्या कामासाठी निर्लज्ज व्हा. आपला मान, सन्मान, अहंकार व  मोठेपणा सर्व काही सोडा. आपल्याला फक्त धेय्य गाठायचे आहे इतके लक्षात ठेवा. ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास घाबरु नका. ठरवूनच ठेवा की शेंडी तुटो वा पारंबी धेय्य गाठायचे म्हणजे गाठायचेच.
कारण यशाचे सर्वोच्च शिखर गाठणे सर्वांच्यानेच होते असे नाही त्यासाठी कठोर परिश्रम करणारी व्यक्ती लागते. जर कोणी एक व्यक्ती त्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकते तर आपण का नाही? ह्या विचाराने शहाण्या माणसाने वेडे होऊन चालत राहावे. कारण हे वेडपणच आपल्याला आपल्या मार्गात टिकवून ठेवू शकते. आपण किती हळू चाललो हे महत्त्वाचे नाही तर आपण चालत चालत कोठपर्यंत पोहोचलो यालाच महत्त्व असते. ससा आणि कासवाची गोष्ट आपल्या प्रत्येकालाच लहान पणापासून माहीत आहे. धावण्यात चपळ असूनही ससा मागे राहिला कारण त्याच्याजवळ सातत्य नव्हते त्याउलट कासवाने हळूहळू का होईना शर्यत पूर्ण केली व आपले ध्येय गाठले. चातुर्य आणि शहाणपण एकीकडे आणि मेहनत आणि चिकाटी एकीकडे. ध्येय गाठण्यासाठी सर्व सद्गुणांची सांगड घालून सुद्धा जर आपल्या अंगी टिकून राहण्याची चिकाटी नसेल तर कदाचित अंगी असलेले दुसरे सर्व गुण व्यर्थ होऊ शकतात म्हणूनच धीर आणि चिकाटी न सोडता विजय मिळेपर्यंत प्रयत्न करीत रहा.

Thursday, October 7, 2021

आयुष्य जगण्याचा मूलमंत्र

फुलांचा सुगंध हा ज्या दिशेला वारा असेल त्या दिशेला पसरतो मात्र व्यक्तीच्या स्वभावातला चांगुलपणा सर्व दिशेला पसरतो. माणूस मनात म्हणतो की माझ्याजवळ पैसा आला की मग मी काहीतरी चांगले करीन पण पैसा माणसाला म्हणतो तू काहीतरी चांगले कर मगच मी येईन.
काळासोबत चालले नाही तरी चालू शकते पण नेहमी सत्यासोबत राहायला हवे कारण सत्य तुम्हाजवळ असेल तर काळ आपोआपच तुमच्या सोबत येईल. समजावण्यापेक्षा समजून घेण्यासाठीच मोठी परीक्षा असते कारण समजावण्यासाठी अनुभव आणि ज्ञान लागते पण समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो जो सर्वांकडे नसतो. नेहमी आपल्या मनातील चांगल्या विचारांना प्रोत्साहन आणि उत्तेजन द्या कारण आपण आपल्या विचारांपेक्षा जास्त मोठे कधीही होऊ शकत नाही. जे वात बघतात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतात, जास्त चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्कृष्ट गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. एकदा प्रयत्न केल्यावर अपयश आल्यास थांबू नका कारण प्रयत्नांती परमेश्वर हे कोणी उगाचच म्हटलेले नाही. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खूपच लहान आहेत असे समजा. आयुष्य अवघड आहे हे खरे पण ते अशक्य मुळीच नाही हे देखील तितकेच सत्य आहे. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर नेहमी जगाचा विचार करणे सोडून द्या.

Tuesday, September 21, 2021

खरा महान कोण??

मी किती मोठा आहे हे दाखवण्यासाठी एकदा एका विशाल समुद्राने लहानशा झऱ्याला चिडवून म्हटले, तू कधी पर्यंत लहानसा झराच बनून राहणार आहेस मोठा समुद्र कधी होशील तू?? समुद्राचे असे हिणवणारे शब्द ऐकल्या नंतर झऱ्याने नम्रपणे समुद्राला उत्तर दिले, महान आणि मोठे होऊन खारट बनण्यापेक्षा मी लहान असून गोड बनून राहीन हेच माझ्यासाठी उत्तम आहे कारण तू इतका मोठा असून तुझ्याजवळ भरपूर पाणी आहे तरी तुझे पाणी पिण्यायोग्य नाही पण येथे माझ्या जवळ तर जंगलाचा राजा सिंह देखील येऊन पाणी पिण्यासाठी माझ्यासमोर वाकतो. झऱ्याचे हे उत्तर ऐकून समुद्र खजील झाला आणि गप्प बसला. 

      असेच माणसाचे देखील आहे, स्वतःला मोठे आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ समजून इतरांना तुच्छ मानण्याने कोणी महान बनू शकत नाही. अशा प्रकारे स्वतःला महान समजून दुसऱ्यांची परवा न करता स्वतःच्या गुर्मीत जीवन जगण्यापेक्षा लहान बनून लोकांच्या जीवनात आनंद देऊन त्यांच्या उपयोगी पडणे केव्हाही चांगले. कारण महानता तुमच्या मोठ्या आकाराने किंवा हुद्द्याने  मिळत नाही तर तुमच्या वागण्यातील मोठेपणाने मिळते.

Friday, July 9, 2021

सफल आयुष्याचा मूलमंत्र

आयुष्यात दोन गोष्टी कधीही करू नका चुकीच्या व्यक्तीवर प्रेम आणि खऱ्या व्यक्ती सोबत गेम.

संकट नेहमी अप्रतिम लोकांच्या वाट्याला येतात, कारण ती लोकं त्या संकटांना अप्रतिम रीतीने तोंड देऊ शकतात

जे लोक संयम ठेवून वाट पाहू शकतात त्यांच्याजवळ प्रत्येक गोष्ट काही ना काही करुन पोहोचतेच 

स्वप्न त्यांना म्हणत नाही की आपण झोपल्यावर पाहतो, स्वप्न तर त्यांना म्हणतात जे तुम्हाला झोपू देत नाही

हृदयाचे धडधडणे फक्त एवढा दाखवते की माणूस जिवंत आहे की नाही पण डोळ्यातली चमक हे दाखवते की माणूस जीवन जगत आहे की नाही

काटे टोचल्यावर आपण काट्यांना दोष कसा देऊ शकतो, पाय तर आम्ही त्यांच्यावर ठेवला होता ते तर त्यांच्या जागी स्थिर होते

जगात सर्वात चांगला विचार तुम्हाला करायचं असेल तर सर्वप्रथम दुसऱ्यांविषयी वाईट विचार करणे बंद करा

डोक्यात विचारांचा ट्रॅफिक जितका कमी असेल तितकाच जीवनाचा प्रवास सोपा होऊन जाईल


गोड भाषण चांगल्या सवयी, उत्तम व्यवहार आणि चांगले लोक नेहमीच सन्मान पावतात

Sunday, June 27, 2021

शब्द प्रेरणा

शब्द फुकट भेटतात पण तुम्ही ते कसे वापरता यावरून शब्दांची आणि तुमची किंमत ठरत असते.

वेळ वाईट असेल तर मेहनत करा, वेळ चांगली असेल तर कोणाची मदत करा.

प्रत्येक व्यक्ती आपल्या जिभे मागे लपलेला असतो जर तुम्हाला त्या व्यक्तीला समजायचे असेल तर त्यांना बोलू द्या.

घट्ट पकडल्याने देखील कधीकधी नाजूक बोटे हातातुन सटकतात म्हणूनच कोणतेही नाते जोर लावून नव्हे तर प्रेम लावून धरले जाते.

जरी लोकांना वाटते की तुम्ही चांगले करावे परंतु हे देखील सत्य आहे की त्यांना असं कधी वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले करावे.

भाग्य देखील त्यांना साथ देतो जे कठीण परिस्थितीत देखील आपल्या लक्ष्यासोबत टिकून राहतात.

चूक कडुलिंबाची नाही की तो कडू आहे दोष तर जीभेचा आहे जिला गोड चव आवडते.

सर्वांना ह्याचे दुःख आहे की आयुष्यात खूप कमी भेटले आहे, परंतु जरा विचार करा, जितके तुम्हाला मिळाले आहे तितके देखील कित्येकांना मिळाले नाही.


खोटे ह्यासाठी नेहमी विकले जाते कारण खरे विकत घेण्याची लायकी सर्वांजवळ नसते.


जर तुम्ही पूर्णपणे तुटून गेल्यावरही हसू शकता तर हे नक्की आहे की जगात कधी कोणीही तुम्हाला तोडू शकत नाही.

विश्वास ठेवा, जेव्हा आपण कोणाचे चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी देखील कुठे तरी काही तरी चांगले होत असते.

खरेपणा आणि चांगले पणा यांचा शोध करण्यासाठी संपूर्ण जगात फिरून पाहा... जर तो तुमच्यातच नसेल तर तो कुठेच नाही.


कोणी सन्मान करो वा न करो, चांगले कर्म करीत रहा, कारण सूर्योदय तेव्हाही होतो जेव्हा करोडो लोक गाढ झोपेत असतात.


निंदेला घाबरून आपल्या लक्ष्यापासून भटकून जाऊ नका कारण लक्ष्य साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मते बदलून जातात.

कधी कोणाला जाणून बुजून दुखवू नका, कारण दिली गेलेली वस्तू हजार पटीने आपल्याजवळ परत येत असते.



Saturday, May 29, 2021

रागाचे मूळ

राग का येतो ? तर मनासारखे न झाल्यामुळे. खूप वेळा एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या घटनेविषयी आपल्या मनात आपण एक मनोधारणा तयार केलेली असते. आणि ज्यावेळी आपण मनात विचार केल्याप्रमाणे समोरील व्यक्ती वागत नाही किंवा प्रसंग घडत नाही त्यावेळेस आपल्याला राग येतो. राग येणे ही स्वाभाविक आणि साहजिक गोष्ट आहे. परंतु आपल्या रागामुळे होते काय तर ज्या व्यक्तीवर आपला राग आहे त्या व्यक्तीपेक्षा आपल्याला त्याचा जास्त त्रास सहन करावा लागतो. एक घटना अलिकडलीच माझ्या एका मित्राला मुंबईत मीटिंग अटेंड करायची होती आणि मुंबई मधील वाहनांची गर्दी तर आपल्या सर्वांना ठाऊक आहे. गाडी चालवत असताना त्याने सिग्नल दिला व गाडी बाजूला नेऊ लागला त्यावेळेसच मागून एक दुसरा गाडीवाला भरधाव वेगात येत असताना वेळेवर ब्रेक न लावल्यामुळे त्याची गाडी माझ्या मित्राच्या गाडीला घासली गेली व मित्राच्या गाडीवर ओरखडे उठले. गाडी म्हणजे मित्राचा जीव की प्राण.. गाडीची ही अवस्था बघताच मित्राचा पारा गगनाला भिडला व तो मारमारीच्याच उद्देशाने गाडीतून खाली उतरला. इतक्यात समोरील गाडीतील व्यक्ती सुद्धा गाडीतून उतरली मित्र त्याच्या शर्ट ची कॉलर धरणार इतक्यात तो व्यक्ती अगदी शांतपणे मृदू आवाजात म्हणाला, आय अँम रियली वेरी सॉरी माझ्या घाई मुळे आपल्या गाडीला नुकसान झाले. मी मनापासून माफी मागतो आपल्या गाडीच्या दुरुस्तीसाठी लागणारा सर्व खर्च मी देतो. त्याचे हे शब्द ऐकताच माझ्या मित्राचा राग एकदम शांत झाला. गाडीवर फक्त एक ओरखडा उठला असल्यामुळे त्याच्या कडून कोणत्याही प्रकारची भरपाई मागणे चुकीचे होते. तसेच समोरच्या व्यक्तीने मागितलेल्या माफिमुळे त्या प्रसंगी मोठे भांडण होण्यापासून टळले. तदनंतर माझा मित्र तेथून निघून थेट त्याच्या मीटिंग च्या जागी पोहोचला आधीच उशीर झालेला असताना मध्येच गाडीच्या ह्या लहानशा घटनेमुळे मित्र मीटिंग साठी अर्धा तास उशिरा पोहोचला होता ज्या व्यक्तीसोबत मीटिंग करायची होती त्याच्या तोंडावर त्याची नाराजी स्पष्ट दिसत होती पण तेथे पोहोचताच मित्राने प्रेमळ आवाजात उशिरा येण्या बद्दल दिलगिरी व्यक्त करीत येण्यासाठी झालेल्या उशिराला मागच्या  कारणाला स्पष्ट करून सांगितले व समोरच्या व्यक्तीचा वेळ वाया घालवल्या बद्दल क्षमा मागितली मित्राचे शब्द संपताच समोरच्या व्यक्तीने आपला राग विसरत उलट मित्राच्या हालहवालाची चौकशी केली. ह्या उदाहरणाने एक गोष्ट स्पष्ट झाली की अशाच प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये आलेल्या कोणत्याही रागाच्या प्रसंगी शांत डोक्याने मृदू जीभेचा वापर केला तर नक्कीच समोरच्या व्यक्तीचा व आपलाही राग कमी होण्यास नक्कीच मदत होते.तर मग चला आज पासून कोणत्याही रागाच्या प्रसंगी शांत डोक्याने व प्रेमळ शब्दांनी समोरच्या व्यक्तीचा राग शांत करूया. म्हटले आहे ना, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.