Saturday, May 29, 2021
रागाचे मूळ
राग का येतो ? तर मनासारखे न झाल्यामुळे. खूप वेळा एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या घटनेविषयी आपल्या मनात आपण एक मनोधारणा तयार केलेली असते. आणि ज्यावेळी आपण मनात विचार केल्याप्रमाणे समोरील व्यक्ती वागत नाही किंवा प्रसंग घडत नाही त्यावेळेस आपल्याला राग येतो. राग येणे ही स्वाभाविक आणि साहजिक गोष्ट आहे. परंतु आपल्या रागामुळे होते काय तर ज्या व्यक्तीवर आपला राग आहे त्या व्यक्तीपेक्षा आपल्याला त्याचा जास्त त्रास सहन करावा लागतो. एक घटना अलिकडलीच माझ्या एका मित्राला मुंबईत मीटिंग अटेंड करायची होती आणि मुंबई मधील वाहनांची गर्दी तर आपल्या सर्वांना ठाऊक आहे. गाडी चालवत असताना त्याने सिग्नल दिला व गाडी बाजूला नेऊ लागला त्यावेळेसच मागून एक दुसरा गाडीवाला भरधाव वेगात येत असताना वेळेवर ब्रेक न लावल्यामुळे त्याची गाडी माझ्या मित्राच्या गाडीला घासली गेली व मित्राच्या गाडीवर ओरखडे उठले. गाडी म्हणजे मित्राचा जीव की प्राण.. गाडीची ही अवस्था बघताच मित्राचा पारा गगनाला भिडला व तो मारमारीच्याच उद्देशाने गाडीतून खाली उतरला. इतक्यात समोरील गाडीतील व्यक्ती सुद्धा गाडीतून उतरली मित्र त्याच्या शर्ट ची कॉलर धरणार इतक्यात तो व्यक्ती अगदी शांतपणे मृदू आवाजात म्हणाला, आय अँम रियली वेरी सॉरी माझ्या घाई मुळे आपल्या गाडीला नुकसान झाले. मी मनापासून माफी मागतो आपल्या गाडीच्या दुरुस्तीसाठी लागणारा सर्व खर्च मी देतो. त्याचे हे शब्द ऐकताच माझ्या मित्राचा राग एकदम शांत झाला. गाडीवर फक्त एक ओरखडा उठला असल्यामुळे त्याच्या कडून कोणत्याही प्रकारची भरपाई मागणे चुकीचे होते. तसेच समोरच्या व्यक्तीने मागितलेल्या माफिमुळे त्या प्रसंगी मोठे भांडण होण्यापासून टळले. तदनंतर माझा मित्र तेथून निघून थेट त्याच्या मीटिंग च्या जागी पोहोचला आधीच उशीर झालेला असताना मध्येच गाडीच्या ह्या लहानशा घटनेमुळे मित्र मीटिंग साठी अर्धा तास उशिरा पोहोचला होता ज्या व्यक्तीसोबत मीटिंग करायची होती त्याच्या तोंडावर त्याची नाराजी स्पष्ट दिसत होती पण तेथे पोहोचताच मित्राने प्रेमळ आवाजात उशिरा येण्या बद्दल दिलगिरी व्यक्त करीत येण्यासाठी झालेल्या उशिराला मागच्या कारणाला स्पष्ट करून सांगितले व समोरच्या व्यक्तीचा वेळ वाया घालवल्या बद्दल क्षमा मागितली मित्राचे शब्द संपताच समोरच्या व्यक्तीने आपला राग विसरत उलट मित्राच्या हालहवालाची चौकशी केली. ह्या उदाहरणाने एक गोष्ट स्पष्ट झाली की अशाच प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये आलेल्या कोणत्याही रागाच्या प्रसंगी शांत डोक्याने मृदू जीभेचा वापर केला तर नक्कीच समोरच्या व्यक्तीचा व आपलाही राग कमी होण्यास नक्कीच मदत होते.तर मग चला आज पासून कोणत्याही रागाच्या प्रसंगी शांत डोक्याने व प्रेमळ शब्दांनी समोरच्या व्यक्तीचा राग शांत करूया. म्हटले आहे ना, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment