Tuesday, September 22, 2020

कातरवेळ

संध्याकाळच्या त्या कातरवेळी जेव्हा सर्व जग निरस वाटू लागते, अशावेळी मनातील पुस्तकाची पाने आपोआप चाळली जातात
कटू आठवणींचे काही अनुभव मनातील जखमांची खपली पुन्हा ओरबाडतात 
अपमानाचे ते ओरखडे पुन्हा एकदा चरचरू लागतात
घायाळ झालेल्या हृदयातून पुन्हा एकदा भळाभळा रक्त वाहू लागते
मनाला टोचलेले काटे पुन्हा एकदा सलू लागतात
स्वप्नांची झालेली राखरांगोळी डोळ्यापुढे नाचू लागते
अत्यंत कठोरपणाने धडा शिकवून गेलेल्या व्यक्ती आठवू लागतात
आयुष्यात केलेला सर्व प्रकारचा मूर्खपणा आठवू लागतो
व्यथित झालेले मन ओक्साबोक्शी रडून दुःखाला वाट देऊ पाहते
या सर्वांमध्ये अडकून पडलेला माझा बिचारा जीव गुदमरू लागतो 
अपमानाच्या वेळी ओठा पर्यंत आलेले शब्द जसे मागे घेतल्याचे मला आठवतात
अगदी तसेच मी डोळ्या पर्यंत आलेले अश्रू आवरू लागते
स्वतःच्या चुकांबद्दल का रडू नये ते आठवू लागते
चुकतो तो माणूस, पण चुकांमधून शिकतो तोच खरा विजयी 
पडलेल्या वर हसणारे पुष्कळ असतात परंतु हात देणारे फार कमी
घाय देणारे फार असतात पण मलम लावणारे फार कमी
वाट लावणारे खूप भेटतात पण वाट दाखवणारे क्वचितच
रडणे हा माणसाचा स्वभाव आहे पण रडू आवरून दुसऱ्यांना मदतीचा हात देणे ही माणुसकी आहे
स्वतःच्या डोळ्यांतील अश्रू लपवत दुसऱ्यांना हसवणे ही कला आहे
समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला उभे करून त्याच्या दृष्टीने जगाला पाहणे जास्त लोकांना जमत नाही
स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, परंतु आत्मपरीक्षण करून स्वतःला अधिक चांगले बनवणारे अगदी थोडे असतात 
मनाला हुरहूर लावणारी ती कातरवेळ सरण्याची मी वाट पाहते 
रात्र होताच झालेला तो अपमान, सहन केलेला तो अन्याय, भेटलेल्या त्या जखमा, मनाला टोचलेले ते काटे, झालेल्या त्या चुका हे सर्व निशेच्या त्या अंधकारात मिटवून एका नव्या पहाटेची वाट बघत मी झोपेच्या कुशीत शिरते....



No comments:

Post a Comment