Thursday, September 17, 2020

स्वप्ने पहावीत की नाही?

                 हे तर माझे लहानपणापासून चे स्वप्न होते आज पूर्ण झाले असे कित्येकांना बोलतांना तुम्ही पाहिले असेलच. स्वप्न. अडीच अक्षरांचा हा शब्द प्रत्येकाच्या हृदयात आपली हक्काची जागा घेऊन आहे..मग तो व्यक्ती लहान असो व मोठा श्रीमंत असो वा गरीब स्वप्ने पाहण्यापासून कोणी कोणाला थांबवू शकत नाही. स्वप्नांना कोणती जात नसते स्वप्नांना कोणतेही बंधन नसते. स्वप्नांना कोणतीही मर्यादा नसते. सर्व भावविश्वा च्या पलीकडे असते ते स्वप्न.अमर्यादित असते ते स्वप्न. रात्री झोपू देत नाही ते स्वप्न. दिवसा चैन पडू देत नाही ते स्वप्न.असे हे स्वप्न पहावे की पाहू नये? स्वप्नांशिवाय आयुष्याला मजा नाही. माणसाने जे आपल्या जवळ आहे त्यात समाधानी राहावे हे जितके खरे आहे तितकेच प्रत्येकाने स्वतःच्या हक्काचे एक तरी स्वप्न उराशी बाळगावे हे ही सत्य आहे. खरे पाहता स्वप्न हे आपल्या जीवनाला एक नवीन उमेद देतात. निरस आणि कंटाळवाण्या जीवनात एक संजीवन ओततात. स्वप्ने जरूर पहावीत. ती पूर्ण करण्यासाठी लागेल तितकी मेहनत करावी. आणि हो स्वप्न पूर्ण झाल्यावर जो आनंद होतो ना तो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवाच. स्वप्न मोठे पहावे की लहान? तर याविषयी मी म्हणेन की स्वप्न हे प्रत्येकाचे वैयक्तिक विश्व असते त्यामुळे प्रत्येकाच्या स्वप्नांना प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे महत्त्व असते. कधी कधी लहान लहान स्वप्न पूर्ण करत करत माणूस मोठी मोठी स्वप्ने पाहू लागतो आणि ती प्रत्यक्षात देखील पूर्ण करतो.कधी कधी स्वप्न इतके मोठे असते की ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते. पण स्वप्न पूर्ण झाल्यावर जे आत्म समाधान मिळते ते फार दुर्मिळ असते. पण जर स्वप्न पूर्ण झाले नाही तर... ह्या तर चे उत्तर तसे पाहता फार सोपे आहे. जो पर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत झटून मेहनत करावी. काही स्वप्न साकार होण्यासाठी फार वेळ घेतात. पण याचा अर्थ असा नाही की माणसाने स्वप्ने पूर्ण होत नाहीत म्हणून हार मानवी असा कोणताही नियम नाही की माणसाने एकच स्वप्न पहावे आणि ते पूर्ण करावे. एक स्वप्नपूर्ती करता करता दुसरे लहान मोठे स्वप्न पूर्ण करत करत पुढे वाटचाल करावी. कारण जसे स्वप्न पाहण्यासाठी वय नसते तसेच ते पूर्ण करण्यासाठी ही नसते. तर मग नवनवीन स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!

No comments:

Post a Comment