रस्त्यातील काटे न पाहता उन्हाची तमा न बाळगता
मी मार्ग कापत राहिली.
मी जीवनाच्या मार्गात धावू लागली...
कधी कोणाच्या रुपात शितल सावली लाभली
तर कधी कोणी रस्त्यात स्वार्थी पणाचे काटे पसरवले
कधी कोणी मागून अविश्वासाचा धक्का देण्याचा प्रयत्न केला
तर कधी कोणी यशस्वी न व्हावे म्हणून पाय खेचावयास पाहिले
तरी मी न थांबता धावत राहिली
मी जीवनाच्या मार्गात धावू लागली...
कधी कटू अनुभवांनी डोळ्यांत पाणी दिले
तर कधी कोणाच्या मायेने हृदयात घर केले
कधी अंतःकरणातील आनंदाचा खिसा कोणासाठी रिकामा केला
तर कधी कोणाचे हसू मोल देऊन विकत घेतले
मार्गात आलेल्या सर्व अडचणी सोडवत गेली
मी जीवनाच्या मार्गात धावू लागली...
सुखदुःखाच्या कित्येक घटना मी अनुभवू लागली
दुःख वाट्याला येऊनही मी सुखाचा शोध करत राहिली
मार्गाचे निराळेपण मला जाणवू लागले
तरी थांबायचे नाही हा निश्चय मनाशी करू लागली
अनुभवाची शिदोरी बांधून मी उंच सखल रस्ता तुडवत राहिली
मी जीवनाच्या मार्गात धावू लागली....
रक्तबंबाळ पायांना रस्त्यावरील धोंड्याची ठेच लागून देखील
थोडे थांबून त्या धोंड्यांना दूर सारू लागली
मागून येणारा धडपडू नये याची काळजी घेऊ लागली
अनुभवाने शहाणी होऊ लागली
आता ध्येय दूर नाही आणि मी तेथे पोहोचल्या शिवाय थांबणार नाही
याच विचाराने धावताना जोम धरू लागली
मी जीवनाच्या मार्गात धावू लागली....
असे म्हणतात ध्येय समोर असले की मार्ग खडतर असला तरी असाध्य मुळीच नसतो
पण असाध्य नसला तरी तो सोपा अजिबात नसतो
संपवलेला कठीण मार्ग मी मागे सोडून पुढेच पाहू लागली
ध्येयाला समोर पाहून मी स्वतःशीच हसू लागली
धाव माझी संपत आली तरी जगण्याची जिद्द संपली नाही म्हणूनच न थांबता न थकता
मी जीवनाच्या मार्गात धावू लागली....
No comments:
Post a Comment